• Data Fline

वेगळ्या वाटेचा प्रवासी....

कधी कधी सारं झुगारून प्रवाहाच्या विरुद्ध वहायचं असतं,
प्रवासी तर सारेच होतात, आपण मात्र कोलंबस व्हायचा असतं.....!


खरचं आजच्या युगात अशा वाटा धुंडाळणारे विरळच... असाच एक युवक एका वेगळ्या दिशेने निघालाय. तिथला प्रवास अतिशय खडतर असा होता, पण असे म्हणतात कि प्रवाहाच्या विरूद्ध असे पोहा कि प्रवाहालाही वाटले पाहिजे कि आपण चुकीच्या दिशेने वाहत नाही ना.....! अशीच एक वेगळी वाट निवडली त्याने आणि ती म्हणजे वक्तृत्वाची...

ते त्यांच्या शनिपार येथे असलेल्या ऑफिसला भेटले. निवेदने आणि व्याखाने या क्षेत्रात कार्य करणा-या व्यक्तीचे या कामासाठी स्वतंत्र ऑफिस असण हे तर मी प्रथमच पाहत होतो. तसं पाहिल तर व्यावसायिक दृष्टीने निवेदन किंवा व्याखाने या क्षेत्राकडे बघण हे फार मोठ हिमतीच काम, कारण ते करण्यास कोणी धजावत नाही आणि हे आव्हान त्याने लीलया पेलल. मीच त्याला म्हणालो कि तुमचे एवढे मोठे काम लोकांपर्यंत पोहचल पाहिजे. तुम्ही मला सहकार्य करा आपण तुमची वेबसाईट तयार करू. कारण ज्यांना बोलता येता ते एकतर मिडियात जातात किंवा शिक्षण क्षेत्रात जातात. पण या दोन्ही प्रचलित वाटा धुडकावून लावणारा आणि वक्तृत्व क्षेत्रात वयाच्या २८ व्या वर्षी एक मापदंड निर्माण करणारा युवक, महाराष्ट्राचा युवा वक्ता म्हणजेच सुनिल धनगर.....

शिक्षण घेत असतानांच १२ वी ते एम.ए. या पाच वर्षात ४५० हून अधिक वक्तृत्व-वादविवाद स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि त्यांत ४०० हून अधिक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे. महाराष्ट्र शासनाचे ‘वादविवाद’ कलाप्रकाराचे सुवर्णपदक तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगांव) चे ‘वकृत्व’ कलाप्रकारचे सुवर्णपदक प्राप्त आहे. जळगांव आकाशवाणीच्या युवावाणी विभागात निवेदक म्हणूनही एम.ए. ला असतांना काम केले आहे. एवढंच नाही तर शैक्षणिक वर्षाकडे कधी त्यांनी दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांचे आवडते वाक्य त्यांची कार्यप्रणाली दाखवते ते म्हणजे “ ध्येयाचा ध्यास लागला कि कामाचा त्रास वाटत नाही.”

आतापर्यत ३०० हून अधिक कार्यक्रमांचे यशस्वी निवेदन आणि ४०० हून अधिक व्याखाने वयाच्या २८ व्या वर्षी दिलेले आहे. सोबतच करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, सभेत कसे बोलावे अशा विविध विषयांवर ते कार्यशाळा आयोजित करतात. मागील वर्षी त्यांच्या या कार्याबद्दल त्यांच्या ४०० व्या व्याख्यानाचे औचित्य साधुन त्यांचा विशेष ‘ पुणेरी पगडी’ देऊन सन्मान केला गेला.

निवेदनाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर अगदी नितीन बानगुडे पाटील, निनाद बेडेकर, मंगेश तेंडुलकर अशा मान्यवरांच्या कार्यक्रमांना त्यांना प्रमुख निवेदक म्हणुन बोलावतात. व्याख्यानांचा त्यांचा झंझावात तर सुरूच असतो. अगदी पुण्यातील सर्व नामांकित महाविद्यालयांमध्ये त्यांचे कार्यक्रम झालेत. बाहेरही संपूर्ण महाराष्ट्रभर ते फिरत असतात. त्यांचे ध्येयच आहे कि जास्तीत जास्त युवकांना प्रेरणा मिळाली पाहिजे. कारण युवाच्या उलट केलं तर वायु होतं आणि या वायुच्या वेगाच्या प्रचंड शक्तीचा वापर विघातक कार्यासाठी न करता विधायक कार्यासाठी झाला पाहिजे असे त्यांना वाटते. मा. श्री. हेमंत देसाई, अनिल अवचट अशा मान्यवरांसोबत त्यांना प्रमुख व्याख्याते म्हणुन निमंत्रित केले जाते. त्यांची ही क्षितिजाच्याही पलीकडे जाणारी जिद्द खरंच खूप प्रेरणा देणारी ठरते.

आपल्या क्षमतांची जाणीव होणे आणि पुरेपूर त्याचा वापर करून घेणे यामुळे आपला करिअर ग्राफ कसा उंचावता येतो याचे ते एक उत्तम उदाहरण आहेत. विशेष म्हणजे ब-याच व्याख्यातांचा एकच विषय निवडलेला असतो पण यांचे असे म्हणणे आहे कि तुम्हाला अभ्यास करून कुठल्याही विषयावर बोलता आले पाहिजे यातच वक्त्याचा खरा कस लागतो. करिअर मार्गदर्शनाचा बराचसा अनुभव गाठीशी असल्यामुळे त्यांना नेमक्या विद्यार्थ्यांच्या समस्या समजतात म्हणुन लवकरच त्यांचे करिअर मार्गदर्शनपर पुस्तक ते प्रकाशित करणार आहेतच.

त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! त्यांच्या अशा कार्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न मी या वेबसाईटच्या माध्यमातून करतो आहे.....
आपला
विनील प्रधान
Pravi Design
9860342508

Recent Event